कोर्टाने दिले सुरजागड उत्खनन प्रकरणात वाहतुक चौकशीचे आदेश

0
11

 गडचिरोली ,दि.06 :- जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पातून लोहखनिजाची उत्खन्नन करुन त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची बाब समोर आणत वाहनातून अंदाजीत वजन भरून वाहतूक केले जात असल्याच्या मुद्यावर जनहितवादी संघटनेने लक्ष देत अहेरी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर अहेरी न्यायालयाने वजन न करताच त्याची वाहतूक करण्यात येत असल्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर एटापल्ली पोलिसांना वाहतुकीची चौकशी करुन दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरजागड येथे मोट्या प्रमाणात लोहखनिज असुन याचे उत्खनन करण्याची लीज लॉयड मेटल्स कंपनीला मिळाली आहे. मात्र लोहखनिजाची वाहतूक करताना वजन न करणे, खाणक्षेत्रात धर्मकाटा न उभारणे, वजनपावतीत जेवढे वजन नमूद आहे, तेवढेच वजन टिपीत नमूद न करणे इत्यादी बाबींवर आक्षेप नोंदवीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याने लोहखनिज वाहतुकीची चौकशी करुन संबंधित कंपनीकडून भरपाई वसूल करावी, अशी तक्रार जनहितवादी संघटनेने पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे मागच्या वर्षी केली होती.परंतु या कार्यालयाने याची दखल न घेतल्याने जनहितवादी संघटनेचे संयोजक सुरेश बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्यकर्त्या दिक्षा झाडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. परंतु रजिस्ट्रारने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना केल्यानंतर दिक्षा झाडे यांनी २४४/२०१७ क्रमांकाची याचिका अहेरी न्यायालयात दाखल केली होती.
या याचिकेवर अहेरी न्यायालयाने लोहखनिजाच्या वाहतुकीची चौकशी करुन दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश एटापल्लीच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. तसेच पोलिसांनी कोणत्याही आरोपीवर एफ आय आर दाखल करुन अटक करु नये, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. तक्रारकर्त्यांच्या वतीने अॅड.सतीश जैनवार हे काम पाहत असून, त्यांना अॅड. कुंभारे व अॅड.गलबले यांचे सहकार्य लाभले.