चंद्रपूर वीज केंद्रातील कुलिंग टॉवरला आग

0
9

दुर्गापूर (चंद्रपूर) : येथील वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पातील नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान येथील कुलिंग टॉवरमध्ये काम सुरु असताना अचानक आग लागली. यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संच सुरु होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात ५00 मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी नवव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी सकाळी या संचाच्या कुलींग टॉवरमध्ये आतुन फिन्स नावाचे पॉलीमर मटेरियल लावण्याचे काम सुरू होते. सदर काम मे बीजीआर या मुख्य कंपनीने हाईग्रीवा या कंपनीला पेटी कंत्राट दिले आहे. या कंपनीतील कर्मचारी संचाच्या आत काम करीत असताना अचानक आगीचे लोळ दिसले. संचाच्या अगदी शेजारी अशाच मटेरियलचा मोठय़ा प्रमाणात साठा ठेवण्यात आला होता.
आगीचे स्वरुप बघता लगेच साठा हटविण्यात आला. त्यामुळे मोठी वित्त हानी टळली. आग विझविण्यासाठी वीज केंद्रातील चार तथा महानगरपालिकेची एक गाडी पोहचली. त्यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आली. या आगीत संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, नवव्या संचाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच संच सुरु होणार होता. अशातच आता कुलिंग टॉवरला आग लागल्याने परत काम करावे लागणार आहे. त्यामुळे हा संच सुरू होण्यास आणखी विलंब होणार आहे.र)