खिलाडू वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण-रविंद्र खजानजी

0
13

चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर, दि. 7 :  अनाथ, निराधार, उन्मार्गी बालकांमध्ये सूप्त गुणांना वाव मिळून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असल्याचे प्रतिपादन निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजानजी यांनी केले.ग्रामीण पोलीस मुख्यालय, नारा रोड, इंदोरा, नागपूर येथील कवायत मैदानावर आयोजित  चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आज निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजानजी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी बोलत होते.
यावेळी  महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त एम. डी. बोरखडे,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उप पोलीस अधीक्षक कैलास गावडे, राखीव पोलीस निरीक्षक,नागपूर(ग्रामीण) सतीश रिंगणे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रशांत थोरात, इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सोसायटीचे अर्शद तन्वीर खान, जिल्हा महिला बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी सी. एम. बोंडे, डी. उबाळ, महिला व बाल विकास
विभाग तसेच पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रविंद्र खजानजी म्हणाले,क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ प्राप्त झाले आहे. क्रीडा स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून त्यातून विद्यार्थ्यांना निर्भेळ आनंद आणि खिलाडू वृत्ती तसेच बंधूभाव वृद्धिंगत व्हावा, हा मूळ उद्देश आहे.  क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांची जाणीव होऊन स्वाभिमान जागृत होतो. स्वाभिमानामुळे त्यांना समाजात ताठ मानेने जगता येते. यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आत्मविश्वास वाढवावा, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून  क्रीडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. स्पर्धा निकोप पद्धतीने पार पडावी,यासाठी विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धा
आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालगृह, चाईल्ड लाईन लाभार्थी तसेच विविध शाळेतील  500 विद्यार्थी सहभागी होते.महोत्सवाचा समारोप उद्या, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक(ग्रामीण) शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. संचालन जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या संरक्षण अधिकारी श्रीमती साधना हटवार तर आभार परिविक्षा अधिकारी  सी. एम.बोंडे यांनी  मानले.