पोषण आहारातील मीठाचा रंगच बदलला!

0
21
भाजीत मीठ घालताच होतो निळा 
मुरपार शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस 
गोंदिया,दि.07 : तालुक्यातील रावणवाडी केंद्रा अंतर्गत येणाºया मुरपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजनादरम्यान देण्यात आलेल्या मीठाचा रंग पाणी लागताच बदलून निळा होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला आहे. हे मीठ भाजीत घातल्याने भाजीचाही रंग बदलून काळा पडूत असून चवही बदल आहे. त्यामुळे याचा दुष्पपरिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता असून पोषण आहाराबद्दल गंभीर नसल्याची बाब या निमित्त्याने पुढे येत आहे.
राज्यात शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. त्यातच विद्यार्थी दररोज शाळेत यावे, त्यांना शाळेतच जेवणाची सोय व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्यात शासकीय आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. यात वर्ग १ ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर ग्राम तथा ६ ते  ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५० ग्राम पोषण आहार प्रति विद्यार्थी देण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०९९ शाळा तर २५९ खासगी अनुदानित शाळा आहेत. या शाळांतील १ लाख २५ हजार ७५ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येत असून गोंदिया पंचायत समिती अतंर्गत जिल्हा परिषदेच्या १८८ तर खाजगी अनुदानित १०४ शाळांमध्ये ३४ हजार ५७५ विद्यार्थ्यांना दुपारपाळीत माध्यान्ह भोजन दिले जाते. त्यातच शासनस्तरावर निवड केलेल्या महाराष्ट्र कंजुमर फूड फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येत असून फेडरेशन कडूनच ‘श्री’ डबल फोटीफाईड या नावाच्या मीठाच्या पिशव्या पुरवठा करण्यात आल्या आहेत.  अशात आज, मंगळवारी रावणवाडी केंद्रातील मुरपार येथील जि.प. शाळेत नेहमी प्रमाणे दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात येत असताना या मीठाचा वापर केला असता विद्यार्थ्यांच्या ताटावरील मीठाला पाण्याचा स्पर्श होताच मीठाचा रंग बदलून तो नीळा होत असल्याचे दिसून आले. यावर विद्यार्थ्यांनी हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आणून दिला. दरम्यान शिक्षकांनी भाजीची पाहणी केली असता भाजीचा रंगही नीळसर काळा दिसून आला तर चवीतही बदल झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे संपूर्ण शाळेत एकच खळबळ उडाली. तर या घटनेची माहिती संबंधित केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारींना देण्यात आली. यावर त्यांनी सर्व केंद्र प्रमुखांना अशा प्रकारचे मीठ आढळल्यास ते मीठ विद्यार्थ्यांना देवू नये, कोणत्याही विद्यार्थ्याला विषबाधा सारखे प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, तर याविषयी संबंधित कंत्राटदाराला सुचना देण्यात आली असून मीठ बदली होईपर्यंत बाजारातून वापरण्यायोग्य मीठ खरेदी करून विद्यार्थ्यांना द्यावे, असे सुचीत केले आहे. विशेष म्हणजे या विषयी अधिक माहिती घेतली असता अशाच प्रकारचा मीठ पुरवठा करण्यात येत असल्याचे कळले. असे असले तरी याविषयी संबंधित शाळा प्रशासन व व्यवस्थापन समितीला या विषयीची माहिती नसल्यामुळे ही खळबळ उडाल्याची जाणवते. दक्षता म्हणून या मीठाचा वापर थांबविण्यात आला असून याविषयी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचे गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लोकेश एम. मोहबंशी यांनी सांगितले.