नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या : डॉ.बोपचे

0
14
गोंदिया दि.१४ : जिल्ह्यात काल (दि.१३) वादळी वार्‍यासह आलेल्या गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, तिरोडा, आमगाव या तालुक्यात गारपिटीचा जास्त प्रभाव असून या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे पिक नुकसानग्रस्त झाले आहेत. तसेच भंडारा जिल्ह्यातही अनेक घर व गोठ्यांनाही याचा फटका बसला आहे. तेव्हा शासनाने पुर्वीच दुष्काळाच्या छायेत असणार्‍या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी काल झालेल्या नैसर्गिक आपदेचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी केली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. परंतु, काल (ता.१३) महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गारपिटीचा तडाखा बसला. या तडाख्यात पिकांसह पशु-पक्ष्यांनाही फटका बसला तर दुसरीकडे ग्रामीण भागातील हजारो घर व गोठ्यांनाही या गारपिटीने क्षतिग्रस्त केले. एंकदरीत शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने पूर्णत: खचला असून नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहिर करावी, अशी मागणी डॉ.बोपचे यांनी जिल्हा प्रशासनासह शासनाला केली आहे.