निवडणूक बहिष्काराला फाटा फुटला

0
10
सालेकसा दि.१४ : शासन निर्णयानुसार सालेकसा नगरपंचायतीच्या स्थापनेत आमगाव खुर्दचा समावेश करण्यात यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. दरम्यान, आमगाव खुर्दवासीयांनी आंदोलनदेखील केले. मात्र, त्यावरही शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा आमगाव खुर्दवासीयांनी बहिष्कार केला. यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाने आमगाव खुर्द ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या २७ फेबु्रवारी रोजी निवडणूक होणार आहे. यातही सर्वदलीय समितीने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहिष्काराच्या निर्णयाला फाटा फोडत सरपंच पदासाठी २ उमेदवारांनी, तर २ प्रभागात ४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यावर बहिष्कार समितीने सरपंचपदासाठी पुन्हा एक उमेदवाराचे अर्ज दाखल केले आहे. एकंदरीत आता निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार राहिले आहेत. यामुळे आता निवडणूक होणार, की बहिष्काराचे पेच कायमच आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील तालुकास्थळांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यात सालेकसाचाही समावेश होता. या घोषणेनंतर सालेकसाला लागून असलेल्या आमगाव खुर्दवासीयांनी या गावाचा समावेश सालेकसा नगरपंचायतीमध्ये करावा, ही मागणी रेटून धरली. त्यामुळे सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक वेळेवर होऊ शकली नाही. मात्र, प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही व निवडणूक आयोगाने सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक पार पाडली. त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचाही समावेश होता. मात्र, ग्रामस्थांनी जोपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत पुढील सर्व प्रकारच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यातच जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये पुन्हा आमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. यावेळीही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वदलीय समितीने घेतला. परंतु, नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २ उमेदवारांनी, तर २ प्रभागात ४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यावर बहिष्कार समितीने सरपंचपदासाठी पुन्हा एक उमेदवाराचे अर्ज दाखल केले आहे. एकंदरीत आता निवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार राहिले आहेत.
आमगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवड थेट होणार असून, ५ प्रभाग मिळून १३ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. परंतु, प्रभाग क्र.३ मधून २ व प्रभाग क्र.५ मधून २ असे दोन प्रभागातून ४ सदस्यपदासाठी नामांकन दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी ३ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. आता सर्वदलीय समितीच्या वतीने ही निवडणूक पुर्णत्वास येईल, की नागरिकांचा बहिष्कार कायम राहिल, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.