शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

0
33

नागपूर,दि.19 : ‘शिवमुद्रे’त नमूद असल्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना ‘जगाला वंदनीय ठरेल असे स्वराज्य निर्माण करा’ असे आवाहन केले होते. महाराजांनीही तोच आदर्श ठेवत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मीयांना समान स्थान होते. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता. सर्वांना समान आर्थिक वाटा मिळेल असे त्यांचे धोरण होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने जगाला आदर्श ठरावे असे होते. मात्र आज काही लोक त्यांना हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाजी महाराज आणि वर्तमान स्थिती’ विषयावर आयोजित व्याख्यानात वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.