शिवजयंतीनिमित्त २२ हजार रुपयांची पुस्तके वाटप

0
11

लाखांदूर,दि.20 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त शहराच्या मुख्य मार्गाने वाजतगाजत मिरवणूक काढून सांस्कृतिक व वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी असे काहीही न करता शिवजयंतीकरिता वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपयाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ ज्युनियर कॉलेज, शिवाजी विद्यालय, शिवाजी प्रायमरी शाळेसह अन्य शाळा-महाविद्यालयामध्ये या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांवर आधारीत प्रश्नमंजुषा देखील घेण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचे प्रियंक बोरकर यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक बन्सोडे, प्रा. विश्वपाल हजारे, जितु सुखदेवे, धिरज राऊत, आकाश दखने, अमित मिसार, विक्रम हटवार, लोकेश कोरे, गोलु सुखदेवे, दिनेश वासनिक, स्वप्निल ठेंगरी, प्रशांत येणोळकर, चंद्रशेखर खेळीकर, श्रीकांत बोरकर आदी उपस्थित होते.