पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा-अभिमन्यू काळे

0
11

गोंदिया,दि.२३ : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाण्याची सहज उपलब्धता असणाऱ्या कालव्याच्या दुतर्फा भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
राज्यात यावर्षीच्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अंमलबजावणी करण्याबाबत २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सभेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम.रामानूजम, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, भंडारा जिल्हा निसर्ग संवर्धन संस्थेचे मनीष राजनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरणपुरक वृक्षांची जास्तीत जास्त झाडे लावावी. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्वी तयार करुन ठेवावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याबाबत १५ दिवसात नियोजन सादर करावे असे सांगून ते पुढे म्हणाले, संबंधित यंत्रणांना वृक्ष लागवडीबाबत उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले आहे त्याची यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे सांगितले.
सभेला सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी प्रदिपकुमार बडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.