गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करा-प्रभू राजगडकर

0
28

गडचिरोली,दि.९: गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती, मानवी व्यवहार व आधुनिकता तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना आणि त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास व्हावा आणि त्याविषयीची संधी महाराष्ट्रासह जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ सुरु करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर यांनी केली आहे.

कवी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठविले आहे. पत्रात श्री.राजगडकर यांनी म्हटले आहे की, गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन आठ वर्षे लोटली आहेत. सद्य:स्थितीत या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये असून, त्यात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. हे दोन्ही जिल्हे आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार बऱ्यापैकी होत आहे. सद्य:स्थितीत गोंडवाना विद्यापीठात मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र अशा नेहमीच्याच शाखा आहेत. परंतु ज्या आदिवासीबहुल भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या आदिवासी बोलीभाषा बोलल्या जातात, त्यासंदर्भात या विद्यापीठात भाषाशास्त्राच्या अनुषंगाने कोणताही अभ्यासक्रम नाही, हे दुर्दैव आहे, असे श्री.राजगडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

आज महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये ‘आदिवासी साहित्य’ हा विषय समाविष्ट असून, अनेक संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधी अन्य विषयांवर पीएचडी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी प्रभू राजगडकर यांनी केली आहे. आदिवासी अध्यासन सुरु केल्यास गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती व मानवी व्यवहार आणि आधुनिकता तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना व त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची संधी महाराष्ट्रासह जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध होईल, असेही श्री.राजगडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे.