सशस्त्र नक्षल्यांनी लाकूड डेपो पेटवला

0
8

गडचिरोली,दि.१२: जल, जंगल व जमिनीवर स्थानिकांचा अधिकार असून वनविभागाने वृक्षतोड करु नये, असे फर्मान सोडत आज सशस्त्र नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील तलवाडा येथील लाकूड आगारातील लाकडांना आग लावली. ही घटना आज पहाटे घडली.आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत तलवाडा येथील कक्ष क्रमांक ६६ मध्ये कूपकटाई सुरु असून, तोडलेल्या झाडांचे बिट रचण्यात येत आहेत. काम सुरु असताना आज पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास १० ते १५ सशस्त्र नक्षली तेथे गेले. त्यांनी सुमारे १० ते १५ बिटातील लाकडांना आग लावली. मात्र, लाकडे ओली असल्याने खूप जळाली नाहीत. तरीही वनविभागाचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लावल्यानंतर नक्षल्यांनी मजुरांना वनविभागाचे काम न करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधून पत्रकेही टाकली.

पोलिस आणि वन विभागाच्या कामांवर बहिष्कार घाला, लाकूड बिट, बांबू काढणे बंद करा, वनकर्मचाऱ्यांनी जंगलात प्रवेश करु नये,जल, जंगल व जमिनीवर आदिवासीचा अधिकार असून, ग्रामसभांच्या परवानगीशिवाय नैसर्गिक संपत्तीला हात लावू नका, अशा आशयाचा मजकूर बॅनर व पत्रकांवर आहे. भाकपा माओवादी पेरमिली एरिया कमिटीने हे पत्रक काढले आहे.  घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.