उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

0
9

भंडारा,दि.24 : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार असून उन्हापासून सामान्य नागरिक व रुग्णांच्या बचावासाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी दिल्या. उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावायाच्या सुरक्षेबाबत आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारला आरोग्य विभागाच्या विविध समित्यांची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, कार्यकारी अभियंता ऋृषिकांत राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चाचेरकर, डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधूरी माथूरकर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नियामक मंडळ, साथरोग जिल्हा सर्वेक्षण समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सामान्य रुग्णालय नियामक मंडळ, माता बाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यप्रणाली समिती या विषयांचा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी आढावा घेतला.
उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात नियंत्रण व उपचार कक्ष स्थापन करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच उष्माघात रुग्णास तातडीने उपचार मिळतील याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.