गोंडवन महोत्सवात आ. होळींनी घेतले मंत्री आणि प्रशासनावर तोंडसुख

0
6

गडचिरोली, ता 15-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्फे आयोजित गोंडवन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गडचिरोलीचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री, आमदार व जिल्हा प्रशासनावर तोंडसुख ओढून काही अफलातून वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्फे आज अभिनव लाॅनवर महिला स्वयंसहायता बचत गट व वैयक्तिक स्वयंरोजगारींनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आ डाॅ देवराव होळी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार तर प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशिकला चिळंगे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक, भाजप नेत्या रेखा डोळस, प्रतिभा चैधरी, रमेश भुरसे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते होणार होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, दोन्ही क्षेत्रांचे आमदार व विधानपरिषदेच्या तिन्ही सदस्यांना पाचारण करण्यात आले होते. परंतु आ. देवराव होळी वगळता सर्वांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. 1 वाजताचा कार्यक्रम तब्बल 3 तास उशिरा सुरू झाला. शेवटी आ डाॅ होळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आ. होळी यांनी आपल्या भाषणात सुरूवातीपासूनच आयोजक व जिल्हा प्रशासनावर तोंडसुख घेतले. प्रदर्शनाचे आयोजन नियोजनशून्य असल्याची टीका करून डाॅ. होळी यांनी आजपर्यंतच्या अधिका-यांकडे व्हीजन नसल्याने जिल्हयाचा विकास झाला नाही. विकास न झाल्यानेच सरकारला ‘पेसा‘ कायदा लागू करावा लागला, असे सांगितले. जिल्हा परिषद प्रशासन ऐन मार्च महिन्यात सर्व निधी खर्च करते. अन्य वेळी त्यांचा खर्च शून्य असतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आले नाहीत. त्यामुळे आपण उद्घाटन करून जिल्हा परिषद व विधानसभा क्षेत्राची लाज राखली, असे अफलातून वक्तव्यही डाॅ.होळी यांनी केले. मात्र, हे वक्तव्य करताना मंत्री, आमदार आणि खासदार आपल्याच पक्षाचे आहेत, याचा त्यांना विसर पडला.
यावेळी आ.डाॅ.होळी यांनी बचत गटांच्या वस्तूंचे योग्य मार्केटिंग व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून लोकप्रतिनिधी व लोकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहनही केले. बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी मात्र डीआरडीएच्या कार्याचे कौतुक केले. डीआरडीए व माविमंच्या माध्यमातून महिला बचत सशक्त झाल्याचे सांगून श्री.गण्यारपवार यांनी अनेक कुटुंब स्वबळावर उभे झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीआरडीएचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे,तर संचालन राजू वडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.