मेहता हॉटमिक्स प्लाँटची चौकशी,औद्योगिक निरीक्षकाची भेट

0
13

साकोली,दि.05 : तालुक्यातील चारगाव येथील मेहता हॉटमिक्स प्लाँटमध्ये टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरहून औद्योगिक निरीक्षकांनी प्लाँटची चौकशी केली. या चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस या संघटनेने प्लाँट मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवदेन साकोली पोलीस ठाण्यात दिले आहे.
साकोली तालुक्यातील चारगाव फाट्याजवळ असलेल्या मेहता यांच्या हॉटमिक्स प्लाँटमधील एलडीओची टाकी साफ करताना अनामिक उके व विकास ब्राम्हणकर या दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला. सदर प्रकरण हे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने या प्रकरणाची चौकशी औद्योगिक निरीक्षकांकडून करून तसा अहवाल साकोली पोलिसांनी मागितला. त्यावरून नागपूर येथील औद्योगिक निरीक्षक यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळाला भेट देऊन साकोली पोलिसांना अहवाल देणार आहेत. या अहवलाावरून साकोली पोलीस पुढील कारवाई करतील अशी माहिती पोलीस निरीक्षक पिपरेवार यांनी दिली.
एस.के. मेहता प्लाँट हे चारगाव फाट्यावर मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. या प्लाँटवर ४० ते ५० मजूर नियमित काम करीत असून या प्लाँवर १०० अश्वशक्तीचे विद्युत संच आहे. या प्लाँटवर २० ते ३५ अश्वशक्तीचे चार मोटार कार्यरत आहेत. असे असतानाही फॅक्ट्री अ‍ॅक्ट २ आॅक्टोबर १९९८ च्या नुसार हे प्लाँट फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार नोंदणीकृत नाही. या प्लाँटमधून मागील १५ वर्षात कोट्यवधीचा व्यवसाय झाला असून हा महसूल बुडविण्यात आला आहे. याठिकाणी मजुरांचे मस्टर भरले जात नाही. पीएफ व इपीएफ कामगार आयुक्तांकडे जमा केला नाही. मागील आठ ते नऊ वर्षांपासून प्लाँटवरील मशीन टँक स्वच्छ केलेल्या नाही. अनामिक उके याला केवळ चार हजार रूपये महिना देण्यात येत होता. या प्लाँटवर आरोग्यासंबंधी खबरदारीच्या कोणत्याही सुविधा नसल्याने मेहता यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून यास फॅक्टरीमालक जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मेहता यांच्याविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुटुंबाला फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार २५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीसतर्फे विलास मेश्राम, कैलाश गेडाम, जयशंकर मेश्राम यांनी केली आहे.