सट्टाप्रकरणात ठाणेदारांसह तीन कर्मचारी निलंबित

0
5

भंडारा,दि.16ः-शहरातील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या आयपीएल क्रि केट सामन्यांवरील सट्टय़ावर नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकल्यानंतर खळबळून जागे झालेल्या जिल्हा पोलिस प्रशासनाने भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश रविवारी पोलिस ठाण्यात धडकले. या कारवाईमुळे पोलिस दल चांगलेच हादरून गेले आहे.
पोलिस निरीक्षक मनोज सिडाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केवट व पोलिस हवालदार चंदू भेंडारकर अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. शहरातील म्हाडा कॉलनीतील प्रेमदास रंगारी यांच्या घरी सुरू असलेल्या आयपीएल क्रि केट सामन्यांवरील सट्टय़ावर नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने शुक्र वारी रात्री धाड टाकली होती. या कारवाईत १७ जणांना अटक करण्यात आली होती. तर सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
भंडारा शहरात सट्टा व्यापार सुरू असताना यातून भंडारा पोलिस अनभिज्ञ कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या कारवाईमुळे नागपूर पोलिसांची मान उंचावली तर भंडारा पोलिस संशयाच्या फेर्‍यात अडकले होते. अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज सिडाम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केवट व पोलिस हवालदार चंदू भेंडारकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.