छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईन होईल मार्चपर्यंत पूर्ण

0
18

नागपूर,दि.04 : छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे  १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. याशिवाय जबलपूर ते बल्लारशाह पर्यंत ब्रॉडगेज लाईनचे काम २०१८-१९ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नवनियुक्त ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय  यांनी दिली.
‘डीआरएम’ पदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर त्या पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. शोभना बंदोपाध्याय म्हणाल्या, जुन्या बायो टॉयलेटच्या डिझाईनमध्ये त्रुटी असल्यामुळे मल वाहून जात नव्हता. त्यामुळे टॉयलेटमध्ये दुर्गंधी पसरत होती. या समस्येला दूर करण्यासाठी आता नव्या आकाराचे बायो टॉयलेट लावण्यात येत आहेत. नागपूर विभागातील रेल्वेगाड्यात डिसेंबरपर्यंत हे बायो टॉयलेट लावण्यात येतील. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) वाय. एच. राठोड, मुख्य अभियंता ए. के. पांडे, वरिष्ठ विभागीय अभियंता ए. के. सूर्यवंशी, नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डी. एस. तोमर, जनसंपर्क विभागाचे बीव्हीआर नायडू उपस्थित होते.
‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी सांगितले की, नागपूर-बिलासपूर सेमी हायस्पीड कॉरिडोरसाठी झोन स्तरावर ४५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात या कॉरिडोरचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला १३० किलोमीटर प्रतीतास वेगाने रेल्वेगाडी चालविण्यात येईल. नागपूर-सिकंदराबाद सेमी हायस्पीड कॉरिडोरचे काम मध्य रेल्वे पाहत आहे. मध्य रेल्वेच या दोन्ही कॉरीडोरसाठी समन्वयकाची भूमिका पाहत आहे.
नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, रेल्वेगाड्यात पेंट्रीकारशी निगडित समस्यांचा विभागीय स्तरावर निपटारा करणे शक्य नाही. पेंट्रीकारवर आयआरसीटीसीचे नियंत्रण असते. प्रवाशांना चांगले भोजन मिळावे यासाठी वाणिज्य कर्मचारी पेंट्रीकारवर लक्ष ठेऊन प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तत्पर राहतील.
इतवारीवरून धावतील रेल्वेगाड्या
इतवारीत पिटलाईनचे काम सुरू आहे. ही लाईन तयार झाल्यानंतर पुढील वर्षापासून इतवारीवरून थेट रेल्वेगाड्या चालविणे शक्य होईल. विद्युतीकरणासह नागपूर-नागभिड ब्रॉडगेज लाईनचा १२९३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची समस्या येत असून ती लवकरच सोडविण्यात येईल.