लोकसभा पोट निवडणूकीसाठी २८ नामनिर्देशन पत्र दाखल;राष्ट्रवादीचे कुकडे यांचे नामांकन दाखल

0
20

१०४ उमेदवारांनी केली २०७ अर्जाची उचल
भंडारा, दि. ११ :-भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, गोंदियाचे आ.गोपालदास अग्रवाल, सावनेरचे आ.सुनिल केदार, आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, रमेश बंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, रिपाईचे वसंत हुमणे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेनंतर ट्रॅक्टर मिरवणुकीद्वारे कुकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नामांकनअर्ज दाखल केला.

भविष्यात येणाऱ्या कुठल्याही निवडणुका आपण एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचा मी जिल्ह्यात मोठा भाऊ असल्यामुळे आता ही जबाबदारी माझी राहणार आहे. त्यामुळे राजी-नाराजी, किंतू-परंतु मनात ठेऊ नका. त्यासाठी आपण सर्वांनी भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपमुक्त करण्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. यावेळी खा.पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने वारेमाप घोषणा दिल्या परंतु प्रत्यक्षात घोषणांची अमंलबजावणी झालेली नाही. सर्वच स्तरात असंतोष पसरलेला आहे. आता सर्वांनी मिळून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असे आवाहनही त्यांनी केले.

भंडारा ह्न गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले. यामध्ये पुरुषोत्तम कावळे अपक्ष, नंदलाल दिक्षीत अपक्ष, मधुकर कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस-२ अर्ज, नाना पंचबुध्दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-२ अर्ज, मडावी लटारी कवडू अपक्ष, जितेंद्र आडकू राऊत अपक्ष, अजबलाल तुलाराम अपक्ष, गोपाल तुकाराम उईके अपक्ष, संजय गजानन केवट अपक्ष, किशोर मनोहर पंचभाई अपक्ष, अक्षय योगेश पांडे अपक्ष, काशिराम जगन गजबे अपक्ष, राकेश टेंभरे अपक्ष, पंकज दिलीप फुलसुंगे अपक्ष, धरमराज रामचंद्र भलावी अपक्ष, झिटू रघूजी दुधकंवर अपक्ष, केशव गणपतराव बांते अपक्ष, विनोदकुमार मनोहराव नंदूरकर अपक्ष, राजू रामभाऊ निर्वाण अपक्ष, रामविलास शोबेलाल मसकरे अपक्ष, राजेश खुशाल कापसे अपक्ष यांचा समावेश आहे. संजय केवट व मडावी लटारी यांनी यापूर्वीही अर्ज दाखल केला असल्यामुळे आजपर्यंत एकूण २८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ९ मे रोजी ७ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात हेंमत पटले भाजपा-२ अर्ज, संजय केवट अपक्ष, मडावी लटारी कवडू अपक्ष, राजेश पुरुषोत्तम बोरकर अपक्ष-३, चनिराम लक्ष्मण मेश्राम-२ अपक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्ष, देवराज हरिश्चंद्र बावणकर शिवसेना आणि डॉ. चंद्रमणी हिरालाल कांबळे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी ८ मे रोजी २ उमेदवारांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात विरेंद्र कुमार जायस्वाल भाजपा व अपक्ष म्हणून तर सुहास अनिल फुंडे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूकीची अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजे ३ मे पासून १० मे पर्यंत १०४ उमेदवारांनी २०७ अर्जाची उचल केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी अर्जाची उचल केली.