बॅलेटने निवडणुका पारदर्शी आणि कमी खर्चिक; राजकुमार तिरपुडे

0
13

नागपूर,दि.18 : निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर संशय व्यक्त करण्यात येण्याचे प्रकार घडताहेत. ईव्हीएम हे यंत्र असल्याने, त्यात तांत्रिक बदल करून निवडणुकीचे निकाल बदलविता येऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुका पारदर्शी नाहीच. विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने सुद्धा वारंवार होणारे आक्षेप लक्षात घेता, भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवार १९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संकल्पाचे सामूहिक वाचन करावे , असे आवाहन तिरपुडे यांनी केले.
ते म्हणाले की बॅलेटद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुका ईव्हीएमच्या तुलनेत कमी खर्चात होतात. एक विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी १५० केंद्र असतात. प्रत्येक केंद्रावर २० हजार रुपये किमतीच्या ईव्हीएम मशीनची आवश्यकता असते. ज्याची एकूण किंमत ३० लाख रुपये होते. सोबतच मशीनच्या देखभालीचा खर्च वेगळा असतो.
तुलनेत मतपत्रिकेचा विचार केला असला, निवडणुकीत एका उमेदवाराकडून १० हजार रुपये शुल्क निवडणुक आयोग घेते.
एका विधानसभा क्षेत्रात १० उमेदवार उभे राहिल्यास १ लाख रुपये होतात. एका विधानसभा क्षेत्रासाठी दीड लाख मतपत्रिका छापण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मतपत्रिकेचा खर्च हा ईव्हीएमच्या तुलनेत अतिशय अत्यल्प आहे. शिवाय निवडणुक ीचा खर्च हा करदात्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे नागरिकांवरच त्याचा भुर्दंड बसतो.
शिवाय मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यानंतर मतदार हा आश्वस्त होतो. त्याला योग्य व्यक्तीला मतदान केल्याचे समाधान होते. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे तिरपुडे म्हणाले. पत्रपरिषदेला जयंत कुंभारे, अविनाश नागदिवे उपस्थित होते.