पालकमंत्री महोदय आता पाणी द्या-काँग्रेसचे आंदोलन

0
12
 यवतमाळ दि.०६ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी, यवतमाळच्या नागरिकांना आजवर पाण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिल्या. पावसाळा येऊन ठेपलाय मात्र पाणी अद्याप दिले नाही. याच विरोधात यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीतर्फे, यवतमाळ नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. 
महिला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा माधुरीताई अराठे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात पाण्याची भिषण टंचाई व रस्त्यांची दुर्दृशा झाली आहे. दोन वर्षांपासून शहरातील छोट्या मोठ्या रस्त्यांवर खोदकाम चालु आहे. हि कामे करतांना प्रशासन व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने कोणत्या रस्त्याचे खोदकाम किती वेळा करायचे व ते करतांना जनतेची गैरसोय होऊ नये म्हणुन, पर्यायी व्यवस्था करण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात रोज लहान मोठे अपघात होत आहेत.
धुळ व प्रदुषणामुळे व्यापारीवर्ग तसेच सर्वसामान्य यवतमाळकर त्रस्त झाले आहेत. याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पालकमंत्री मदन येरावार यांचा या आंदोलनात निषेधही  करण्यात आला.या सर्व समस्यांचा निपटारा ताबडतोब करून जनतेला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी, या आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनासाठी पारस वसंतराव अराठे, ललीत जैन, मनिष बोनीकीले, प्रशांत शेटे, सागर सुर्यवंशी, शुभम बावनकर, निलेश बावनकर, शुभम जैस्वाल, ताराबाई नारायणे, कविता नागपुरे, विजया कासटकर, दिपा पाठे, कविता हेमंत कांबळे,वर्षा खत्री, सारीका बोरकर, शिला नागोसे यांनी पुढाकार घेतला. या आंदोलनात शेकडो महिलासह यवतमाळकरांनी सहभाग नोंदविला.