कर्ज वाटप न करणार्‍या बँकांची शासकीय खाती गोठविणार

0
8

भंडारा,दि.19ः-जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप पिक कर्ज वाटप १५ जुलैपर्यंत न करणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बँकेकडे वळती करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज, सोमवारी पिक कर्ज वाटप, मावा व तुडतुडा, पिक नुकसान मदत वाटप, कर्जमाफी, वृक्ष लागवड व मुद्रा योजना या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्टय १00 टक्के पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
या बैठकीस आमदार परिणय फुके, रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीयकृत बँकांचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्टय कमी असल्याने नाराजी व्यक्त करुन पालकमंत्री म्हणाले की, बँकांनी शेतकर्‍यांसोबत चांगले व्यवहार करणे अपेक्षित असून बँका शेतकर्‍यांसोबत असतील तरच सरकार बँकांसोबत राहील, असा इशारा त्यांनी दिला.
खरीप पिक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३५ हजार ६४४ सभासदांना १६४ कोटी ७६ लाखाचे पिक कर्ज वाटप केले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टांपेक्षा अत्यंत कमी कर्ज वाटप केले आहे. यावेळी पालकमंत्री यांनी बँक निहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. १५ जुलै पर्यंत कर्जवाटपाचे उद्दिष्य १00 टक्के पूर्ण करण्याची हमी यावेळी बँकांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना दिली.