उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू

0
8

चंद्रपूर,दि.20 : राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या गर्भवती महिलेवर येथील डॉक्टरांनी योग्य उपचार केला नाही. त्यामुळे त्या गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला.
सोनाली अर्जुन कुळसंगे (२१) रा. देवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. सोनालीला रात्रीच्या सुमारास ताप व उलट्याचा त्रास होवू लागला. त्यामुळे घरच्यांनी तिला रात्री १२ वाजता देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिच्यावर थातुरमातुर उपचार करून दुर्लक्ष केले. प्रकृतीची साधी विचारपुसही केली नाही. त्यामुळे सोनालीची प्रकृती जास्तच खालावल्याने पहाटे ४ वाजताच्या सुमारास तिचा रूग्णालयातच मृत्यू झाला. सोनाली ही सात महिन्यांची गर्भवती होती.
ही घटना माहित होताच सकाळी गावातील नागरिक रूग्णालयावर धडकले. डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळेच सोनालीचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईक व गावकऱ्यांनी करीत रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरूद्ध रूग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईक व गावकºयांची समजूत काढत घटनेला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईक परतले.