विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना अटक

0
7

नागपूर,दि.५ :: वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनआजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात आणि विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले.
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली. मात्र, बंदच्या आव्हाला तुरळक प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘विदर्भविरोधी आमदारांनो परत जा’च्या घोषणा देण्यात आल्या. सरकार आमचे आंदोलन हुकुमशाही करुन दडपत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.सकाळी ११ वाजतापासून आंदोलकांनी शहरातील विविध चौकात जमा होऊन वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ नारेबाजी सुरू केली. परंतु, पोलिसांनी विदर्भवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तुकडोजी चौक, व्हेरायटी चौक, शहीद चौक, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा चौक, महाल, झाशी राणी चौक आदी ठिकाणी विदर्भवाद्यांनी नारेबाजी सुरू करताच पोलिसांनी लगेच त्यांना अटक केली. यात पोलिसांनी व्हेरायटी चौकात आंदोलक समजून सर्वसामान्य नागरिकांनाही अटक केली. परंतु आंदोलनाशी संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या ४० महिला आणि ४५० पुरुषांना दाभा आणि पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. आंदोलनात अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, हिमांशु देवघरे, राजकुमार नागुलवार, राजू झोटिंग, सुरेश वानखडे, विजया धोटे, राजेंद्रसिंग ठाकरे, शीला देशपांडे यांच्यासह समितीच्या ५०० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता आंदोलकांची सुटका करण्यात आली.