रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

0
10

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रवासादरम्यान प्रवासी रेल्वे स्थानकावरील नळांचे पाणी भरून आपली तहान भागवितात. यात मोठ्यांपासून चिमुकल्यांनाही तेच पाणी दिले जाते. कित्येक ठिकाणचे पाणी पिण्या योग्य असते किंवा नसते. शिवाय गाड्यांत जास्तीचे दर आकारून पाण्याची बाटल विकली जाते. श्रीमंतांना पाण्याची बाटल खरेदी करणे परवडते. मात्र गरिबांना रेल्वे स्थानकावरून पाणी भरणे हाच उपाय असतो. अशात पाण्यामुळे तब्येत बिघडण्याचे प्रकारही घडतात. यावर तोडगा म्हणूनरेल्वेने रेल्वे स्थानकांवर शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी हा प्रयोग अंमलात आणला आहे.
सध्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांवर एकूण ३३ मशीन लावण्यात आल्या आहेत. यात बिलासपूर, रायगड, चाम्पा, कोरबा, अकलतरा, रायपूर, भाटापारा, भिलाई पॉवर हाऊस, दुर्ग, तिल्दा, डोंगरगड व राजनांदगाव आदी स्थानकांचा समावेश आहे. यात मशिन्सचे इन्स्टॉलेशन व काऊंटरचे संचालन केले जात आहे. या व्यवस्थे अंतर्गत काऊंटर बनवून मशीनद्वारे पाणी प्रवाशांच्या मागणीनुसार बाटल्यांमध्ये भरून दिले जात आहे. त्यासाठी कमीत कमी पैसे प्रवाशांना द्यावे लागत आहे.
अशाप्रकारे प्रवाशांना शुद्ध व शीतल पाणी मशीनद्वारे मिळत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे सद्यस्थितीत नागपूर रेल्वे मंडळाच्या डोंगरगड स्थानकात एक व राजनांदगाव स्थानकात एक वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात आली आहे. या मशीन्स लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशांना शुद्ध व शीतल जल कमी दरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नागपूर मंडळातील विविध रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यानुसार गोंदिया स्थानकात चार, भंडारा रोड येथे एक, इतवारी एक, छिंदवाडा एक, चांदाफोर्ट एक व बालाघाट स्थानकावर एक अशा एकूण सहा स्थानकांवर नऊ वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.