खमारीत दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर

0
18

गोंदिया,दि.31ः- मागील दोन-तीन वर्षांपासून खमारी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारून पुढाकार घेतला. दरम्यान, आंदोलने, दारू विक्रेत्यांचा मज्जाव, जनजागृती करण्यात आली. दारूबंदीसाठी पुकारलेल्या एल्गारामुळे अनेक महिलांवर गुन्हे दाखल झाले. अखेर जिल्हा प्रशासनाने खमारी येथील दारूबंदीच्या प्रस्तावाला स्वीकृती देऊन लोकशाही पद्धतीने पारीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काल (दि.२९) गुप्त मतदान पद्धतीने महिलांनी दारूबंदीच्या प्रस्तावाला १९00 मतांनी पारित केला आहे. खमारीत महिलाशक्तीपुढे अखेर दारूची बाटली आडवी झाली.
दोन वर्षांपूर्वी खमारी येथील महिलांनी ग्रा.पं. प्रशासनापुढे गावात दारूबंदीचा प्रस्ताव मांडला. दरम्यान, ग्रामसभेत दारूबंदीच्या प्रस्तावाला मंजूर करण्यात आले. यानुरुप गावात दारूबंदी करण्यात आली. मात्र, अवैध दारूविक्री आणि परवानाधारकांकडूनही दारू विक्री सुरूच होती. याविरुद्ध महिलांनी अनेकदा निदर्शने केली. अवैध दारूविक्रेत्यांचा मज्जाव केला. पोलिस स्टेशन, जिल्हा प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. एवढेच नव्हे तर दारू विक्रेत्यांच्या मालाची नासधूसही केली. परिणामी, अनेक महिलांवर गुन्हे दाखलही झाले. मात्र, दारूबंदीसाठी सरसावलेल्या महिलांपुढे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
जिल्हा प्रशासनाने खमारी गावात दारूबंदीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. गावातील महिलांचे ह्यआडवी आणि उभी बाटलीवर गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपयर्ंत जि.प. शाळेत ५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच गावात दारूबंदी व्हावी, यासाठी महिलांनी मतदानासाठी उत्साह दाखविला. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रांवर महिला मतदारांची गर्दी पहावयास मिळाली.
एकूण ३ हजार २९८ मतदारांपैकी २१८0 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, दारूबंदीच्या प्रस्तावाच्या बाजूने १९00 मते मिळाली. शासन निर्णयाप्रमाणे एकूण मतदारांच्या ५0 टक्क्याहून अधिक मतदान दारूबंदीच्या बाजूने झाले, तर गावात दारूबंदी गृहीत धरली जाते. यानुरुप खमारी येथील महिलांनी दारूबंदीविरुद्ध एकवटून प्रस्तावाला संमती दर्शविली आहे. गत दोन-तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर महिलांच्या वतीने खमारी गावात दारूबंदीसाठीचा लढय़ाला यश आले आहे.