भामरागडसह अनेक गावे जलमय

0
14

गडचिरोली,दि.20: जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नदी व नाल्यांना पूरआला आहे. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. इतरही अनेक गावे जलमय झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलचेरा तालुक्यातील दिना नदीला पूर आला. त्यामुळे मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. किष्टापूर नाल्याच्या पलीकडे १२ गावे आहेत. पुरामुळे याही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्याबरोबरच छत्तीसगड राज्यातही रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भामगरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व छत्तीसगड सीमेलगत वाहणाऱ्या इंद्रावती या तीनही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहेत. पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने घर व दुकानातील वस्तुंचे नुकसान झाले आहे. संपूर्ण भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या नाल्यांना पूर आल्याने सदर मार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गसुद्धा बंद पडला आहे. गडचिरोली शहरातील सकल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.