अखेर नवोदयचे विद्यार्थी ‘माविम’च्या इमारतीत

0
8

भंडारा,दि.25ः-नवोदय विद्यालय व तेथील ३६ विद्यार्थ्यांना अखेरीस जिल्हा प्रशासनाने शुक्र वारी मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रात (माविम) हलविले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
गेल्या महिन्याभरापासून नवोदय विद्यालयाच्या इमारतीचा मुद्दा गंभीर बनत चालला होता. त्यावर जिल्हा प्रशासनाने हा तात्पुरता उपाय शोधून काढला आहे. या विद्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने मागील वर्षी जकातदार शाळेच्या परिसरात हे विद्यालय सुरू करण्यात आले. परंतु, सदर इमारत जीर्ण असल्याने इमारत रिकामी करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिल्यानंतर नव्या इमारतीचा शोध सुरू झाला. शेवटी जिल्हा प्रशासनाने नवोदय विद्यालय अल्पसंख्यांक विभागाच्या वसतीगृहात हलविण्याचा निर्णय घेतला. १५ ऑगस्ट रोजी या वसतीगृहात विद्यार्थ्यांना हलविण्यात आले होते. परंतु, त्यानंतर माविमच्या इमारतीला हिरवी झेंडी मिळाल्याने शुक्र वारी सर्व विद्यार्थ्यांना त्या इमारतीत हलविण्यात आले. एकूण ७३ चौरस मीटर क्षेत्रात असलेल्या माविम प्रशिक्षण इमारतीचा संपूर्ण तळमजला आणि विद्यार्थ्यांना राहण्याकरीता लागूनच असलेल्या ८ खोल्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निकाल व यादी दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल असे उपायुक्त यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी कळविले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले. नवीन ठिकाणी जातांना विद्यार्थ्यांच्या चेहरावर आंनद दिसत होता. नवोदय विद्यालयातील विद्यार्थांना मोहाडी येथे शुभेच्या देवून निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी मार्गस्थ केले. नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आंभोरे व इतर अधिकारी तसेच विद्यालयाचे शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.