शार्पशूटर पाहून ‘परत जा’ च्या घोषणा

0
12

यवतमाळ,दि.14 – यवतमाळ आणि राळेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने आतापर्यत बारा जणांचे जीव घेतले. याला वाघीण कारणीभूत नसून वन खातेच जबाबदार असल्याचा आरोप येथील विदर्भ जैवविविधता रक्षक संघटनेचे अध्यक्ष पराग दांडगे यांनी केला आहे. वाघिणीला मारण्यासाठी खास हैद्राबादहून बोलावलेला शार्प शूटर नवाब शफतअली खान हा अनेक अवैध धंद्यात गुंतलेला असून त्याला कर्नाटक पोलिसांनी माओवाद्यांना शस्त्रे विकल्या प्रकरणी अटक केलेली आहे. त्यामुळे त्याचे नाहक लाड पुरवण्याऐवजी त्वरित परत पाठवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना (प्रादेशिक) निवेदनात केली.

वनविभाग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत असून बेशुद्ध करणाऱ्या चमू ऐवजी नवाबला जास्तीचे महत्त्व देत असल्याचा आरोप पराग दाडगे यांनी केला आहे. नरभक्षक वाघीण प्रकरणी एनटीसीएने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून वाघिणीला जेरबंद करण्यात यावे, या परिसरात झालेल्या जीवित हानीला वनविभागच जबाबदार आहे. तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारून छाव्यांना संरक्षित करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. राळेगाव आणि पांढरकवडा भागातील अवैध गुरे चराईसह इतर अवैध कारवायांवर वेळीच कारवाई केली असती तर आज ही वेळ ओढवली नसती, असेही ते पुढे म्हणाले.

राळेगाव आणि पांढरकवडा भागात वाघिणीचे वास्तव्य असलेला भाग डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात तृणभक्षी प्राण्यांची संख्याही कमी आहे. जंगलात चराई तसेच इतर कामांसाठी जंगलतोड जास्त आहे. या घुसखोरीतून वाघिणीच्या हल्ल्यात माणसे मारल्या जात आहेत. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तज्ज्ञ माणसे व शार्प शूटर वनखात्यात आहेत. या शिवाय एसटीपीएफचे रेस्क्यू यूनिटही आहे. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नवाबची बडदास्त ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, खात्यातील कर्मचारी नाराज असल्याचे दांडगे यांनी म्हटले आहे. जन आक्रोश आणि योग्य उपाय योजनांअभावी वाघीण मारली गेल्यास तिचे बछडे अनाथ होतील.