हेमराज बागूल यांनी स्वीकारला माहिती संचालकपदाचा कार्यभार

0
15

नागपूर,दि.24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर – अमरावती विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज शुक्रवार (दि. 21) रोजी नागपूर येथे पदाची सूत्रे स्वीकारली.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालकपदी प्रथमच थेट निवड करण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या पदावर सरळ सेवेने निवड झालेले श्री. बागुल हे पहिलेच अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून सध्या ते काम पहात होते.
माहिती संचालक हेमराज बागुल यांनी धुळे येथील जयहिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर तेथीलच विद्यावर्धिनी महाविद्यालयातून वृत्तपत्र विद्या आणि संज्ञापन अभ्यासक्रमातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. धुळे आणि नाशिक येथे काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत 2006 मध्ये सहाय्यक संचालक या पदावर मंत्रालयात रुजू झाले. त्यानंतर 2008 मध्ये वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती. महासंचालनालयात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
प्रभारी संचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन पदाची सूत्रे दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, केशव करंदीकर उपस्थित होते.