नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे-विभागीय आयुक्त पियुष सिंह

0
12

 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक

वाशिम, दि. २६ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्धी करण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी करता येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, दि. १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या करणाऱ्या व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नोव नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची मोहीमही राबविण्यात येत आहे. दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली असून त्यावर काही आक्षेप असल्यास त्यांनी विहित कालावधीत नोंदवावा, जेणेकरून ऐन मतदानाच्या वेळी संभ्रम निर्माण होणार नाही. तसेच सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्त करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सदर प्रतिनिधींची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी व दुबार, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात आतापर्यन १४ हजार ७९ नवीन मतदारांची नोंदणी झाले आहे. तसेच दुबार व मयत मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुध्दा सुरु आहे. प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदणीची कार्यवाही सुरु असून बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत याची माहिती घरोघरी जावून देण्यात आली आहे. तसेच याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून राजकीय पक्षांच्या स्तरावरून सुध्दा याबाबत लोकांना माहिती देवून वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.