संविधान सन्मान यात्रा नागपुरात दाखल

0
6

नागपूर,दि.12 : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होतांना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जन आंदोलनाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम् यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. या यात्रेदरम्यान शेतकरी, मजूर, कामगारांसह एकूणच नागरिकंच्या समस्या व त्यांच्या संविधानिक अधिकार व शासन ते कसे हिरावून घेत आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभगी झालेले मध्य प्रदेशतील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), रत्ना भर्गव, दिपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. सुनीलम् म्हणाले, सध्या संविधान धोक्यात आहे. संविधान वाचवण्याचे कार्य सरकारला करायला हवे परंतु ते करीत नसल्याने आता लोकांनाच संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे लागले, म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे.