दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री बडोले

0
19

दिव्यांगांना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण
गोंदिया,दि.१३ : पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे. दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१३ ऑक्टोंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. आमदार सर्वश्री विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या विकासाठी असलेला विविध योजनेतील निधी तीन टक्क्यावरुन पाच टक्के करण्यात आला आहे. झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना शंभर टक्के प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी प्रतिष्ठान निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार अग्रवाल म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण करण्यात येत आहे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आमदार रहांगडाले म्हणाले, शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरुन दिव्यांग बांधवांचे जीवन सुखी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मुकेश बडगे यांना स्मार्ट फोन, भूजल रहांगडाले-मोबाईल फोन, चंद्रशेखर सहारे-श्रवणयंत्र, सुरेखा सहारे-श्रवणयंत्र, नेहा रहांगडाले-एम.आर.कीट, मंदीप वासनिक-स्मार्ट केन, बाबुलाल रहांगडाले-वॉकींग स्टीक, प्रमिला भांडारकर-कुबडी, कुणाल असोले- एम.आर.कीट, अभिषेक बरडे-सी.पी.चेअर, अनमोल नागपुरे-व्हीलचेअर, विनोद बरडे-ट्रायसिकल, आत्माराम चुटे-ट्रायसिकल, भुमेश्वर रहांगडाले-सी.पी.चेअर व ममता नागरीकर यांना ट्रायसिकल वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत राजु साखरे व निलकंठ सरजारे यांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.समाज कल्याण अधिकारी मिलींद रामेटेक यांनी केले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले, उपस्थितांचे आभार उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी सदस्य देवसूदन धारगावे यांनी मानले. कार्यक्रमास समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, विभागीय निरिक्षक महेंद्र माने, दिव्यांग बांधव व त्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.