शासनाच्या धोरणाविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी दिले धरणे आंदोलन

0
11

गोंदिया,दि. २२ः– राज्य सरकारने 21 ऑगस्ट रोजी शासकीय निर्णय काढून रेशनच्या बदल्यात डीबीटी योजना लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकासमोर अडचणी निर्माण केल्यामुळे या धोरणांच्या निषेध नोंदविण्यासाठी आज २२ ऑक्टोबर रोजी राज्य संघटनेच्या आव्हानावर गोंदिया तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच येत्या १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व दुकानदार व कार्डधारकांच्या मोचार्चे आयोजन करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष योगराज रहागंडाले यांनी केली.आंदोलनामध्ये गोंदिया जिल्हा सरकारी रेशन व केरोसीन विक्रेता संघाचे अध्यक्ष योगराज रहांगडाले, सचिव खेमराज साखरे, कोषाध्यक्ष दुर्गेश रहांगडाले, सहसचिव खेमेंद्र वासनिक यांच्यासह तालुक्यातील सर्वच रेशन व केरोसीन विक्रेत उपस्थित होते.
आंदोलनानंतर तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.त्या निवेदनात  महाराष्ट्रातील सर्व कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच धान्य उपलब्ध व्हायला पाहिजे, केरोसीन परवानाधारकांना नियमित रुपाने केरोसीन पूर्ववत सुरू व्हायला पाहिजे, चंडीगड व पांडिचेरी या दोन्ही राज्यात रोख सबसिडीचे निर्णय व व्यवस्था परत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्था पूर्ववत लागू करण्यात यावी, महाराष्ट्र राज्यातील मुंबई व ठाणे या दोन्ही जिल्ह्यात डीबीटी आधारावर सुरू केलेली योजना बंद करावी, संपूर्ण देशात परवानाधारकांना २00 ते ३00 रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्याबाबत देशात स्वस्त धान्य दुकानदारांना कमीत कमी तीस हजार रुपये महिना मानधन देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता.