८६ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रीयेकरिता तपासणी

0
16

गोंदिया,दि.२३ : सर्वशिक्षा अभियानाच्या वतीने जिल्ह्यातील अस्थिरोगाशी संबंधीत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आज मंगळवारी(दि.२३) तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागाई नारायणजी मेमोरिअल फाउंडेशन नागपूर मार्फत जिल्ह्यातील अस्थिव्यंग बालकांना तपासणीकरिता आमंत्रित करण्यात आले होते. नागपूर येथील प्रवेरा रुग्णालयाचे डॉ. विजय शिंगाडे, डॉ. रोशनी शिंगाडे आणि डॉ. अल्पना मुळे यांनी बालकांची तपासणी केली. यावेळी आमगाव तालुक्यातील १५, देवरी १०, गोरेगाव ११, सालेकसा ७, गोंदिया १८, तिरोडा ९, आमगाव ९ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील ७ बालक सहभागी झाले होते. दरम्यान नागपूर येथील आलेल्या डॉक्टरांनी बालकांची तपासणी करून शस्त्रक्रीया आवश्यक आहे, अशा बालकांची निवड केली. त्यांच्यावर नागपूर येथे नागाई नारायणजी मेमोरिअलतर्फे मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. उर्वरित बालकांवर औषधोपचार देखील मोफत करण्यात येणार आहे. शिबिराला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भेट देवून बालक आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. आयोजनाकरिता अपंग समावेशित विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे आणि त्यांच्या तालुका समन्वयकांनी सहकार्य केले.