रुग्णालयात ६ नवजात बालकांचा मृत्यू

0
9

चंद्रपूर,दि.25ः- दसर्‍याच्या दिवशी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात ६ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून अधिष्ठाता डी. एस. मोरे व बाल रुग्ण अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना तात्काळ हटविण्याची मागणी प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
नवजात बालकासाठी सामान्य रुग्णालयात बाल रुग्ण अतिदक्षता विभाग आहे.या विभागात कार्यरत डॉक्टरांचे रुग्ण सेवा करण्यापेक्षा इतर गोष्टींमध्ये ढवळाढवळ करतात अशी चर्चा असून परिणामी रुग्णसेवेमध्ये अनेक गंभीर गैरप्रकार झाल्याचे उदाहरण  समोर आलेले आहे. मात्र आता ऐन दसर्‍याच्या दिवशी या विभागांमध्ये ६ नवजात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे या सगळ्या गैरप्रकारांचा कळस गाठलेला आहे. प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या परिचयातील सौ. जयश्री पानघाटे नामक एका महिलेला काही दिवसांपूर्वी प्रसूतीकरिता सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. प्रसूतीनंतर सदर महिलेला मुलगा झाला.या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला बाल रुग्ण दक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले होते.
या रुग्णाबाबत देशमुख यांचा सातत्याने रुग्णालय व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी जयश्री पानघाटे यांच्या मुलाचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी सरकारी दवाखान्याकडे धाव घेतली.तेव्हा दवाखान्यातील चर्चेतून आजच्या तारखेला रुग्णालयात अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना कळली. नगरसेवक देशमुख यांनी सतत याबाबत सविस्तर माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आईच्या नावानिशी दगावलेल्या रुग्णांची माहिती मिळाली. मोनाली कुकडकर गडचिरोली, रजनी उपरे तुकुम चंद्रपूर, प्रगती चांदेकर माता नगर चंद्रपूर, रोहिणी वाडके चिरोली, सपना नरुले मुल, जयश्री पानघाटे बोपापूर जिल्हा. यवतमाळ या सर्व महिलांच्या नवजात बालकांचा या दिवशी दुदैर्वी मृत्यू झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते. या महाविद्यालयामुळे उच्चशिक्षित व आधुनिक तंत्रज्ञानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र रुग्णालयाचे व्यवस्थापन व अधिष्ठाता यांच्या भोंगळ कारभारामुळे या रुग्णालयाची स्थिती आजारी झाल्यासारखी आहे. यामुळे सामान्य रुग्णालयच बरे होते अशी भावना लोकांच्या मनात निर्माण होत आहे.याबाबत अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी वेळोवेळी तक्रारी व आंदोलन करूनही शासनाने योग्य कारवाई केलेली नाही.देशमुख यांनी वारंवार पालकमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, परंतु पालकमंत्री सुद्धा आश्‍वासन व पत्र देण्याखेरीज काहीच करत नाहीत अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता या आजारी रुग्णालयाला दुरुस्त करण्यासाठी आक्रमक आंदोलन करून शस्त्रक्रिया करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला.