गडचिरोलीत मोर्च्यातून माना समाजाचे शक्तिप्रदर्शन

0
5

गडचिरोली,दि.25 : माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त माना समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे स्वरूप पाहून जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेची ताराबंळ उडाली.यावेळी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड.नारायण जांभुळे, माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, बळीराम गरमळे, देविदास जांभुळे, अरविंद सांधेकर, भगवान नन्नावरे, श्यामराव नन्नावरे, शंकर भरडे, माधवराव जांभुळे, नंदू दडमल, शांतराम चौखे, गोविंदराव चौधरी, गुलाब हनवते, विवेक शेंडे, कुलदीप श्रीरामे, गोपाळराव मगरे, केशव जांभुळे, रमेश राणे, मनीष नारनवरे, बाळू सावसाकडे, बाळकृष्ण राजनहिरे, देवराव नन्नावरे, भाऊराव धारणे, रामराव नन्नावरे, कुलदीप श्रीरामे आदी उपस्थित होते.
विदर्भ आदिवासी माना समाज कृती समिती व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून कार्यालयावर निघालेला हा मोर्चा कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडकला. या विशाल मोर्चातून माना समाजाने शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
माना समाज संघटनेमार्फत केलेल्या आवाहनानुसार, सदर मोर्चासाठी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यातील समाजबांधव सकाळी गडचिरोली शहरात दाखल झाले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात एकत्र जमले. एक ते दीड तासात सर्वसमाज बांधव येथे एकत्र आले. त्यानंतर सदर मोर्चेकरी समाजबांधव शिस्तीत कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडे निघाले. या मोर्चात विद्यार्थी, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्समार्गे आयटीआय चौक ते समिती कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहोचला. दरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सदर मोर्चादरम्यान समाजातीलच युवक स्वयंसेवकाची भूमिका बजावत होते. अत्यंत शिस्तीच्या वातावरणात शांततेत समाजाचा मोर्चा कार्यालयावर धडकला. मोर्चा कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. या सभेत समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.