पुलगावात पाच दुकानांची राखरांगोळी

0
10

वर्धा,दि.09: जिल्ह्यातील पुलगाव शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. आग बघून नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरु केले. बुधवारी रात्री ९.४० वाजता घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.
मुख्य बाजार चौकातील बोहरा समाजाच्या व्यापाऱ्यांची मोठी प्रतिष्ठाने असून यातील पाच हार्डवेअरला रात्री ९.४० वाजता अनाचक आग लागली. आगीमुळे शहरात पडलेला लख्ख प्रकाश पाहून सर्वत्र खळबळ उडाली होती. तब्बल तीनतास चाललेल्या या अग्नितांडवामध्ये पाचही दुकानाची राखरांगोळी झाली तर दोन घरांचेही नुकसान झाले आहे.
या बाजारपेठेतील दुकानांमध्ये असलेले फटाके तसेच दुकानांमागील घरातील गॅस सिलिंडर व महिलांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह समाजसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. या भीषण आगीत सैफी हार्डवेअर्स हकीमी हार्डवेअर्स, सैफी मशनरीज, भामल ट्रेडर्स, मोईजुद्दीन फकु्रद्दीन या प्रतिष्ठांमधील साहित्य जळून राख झाले. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.