इटियाडोहच्या पाण्यासाठी अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

0
10

लाखांदूर,दि.20ः- इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही. अखेर मंगळवारपासून ११ गावातील सरपंच, बेरोजगार युवक व शेतकऱ्यांनी मुर्झा येथे तंबू उभारून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
या तलावात इटियाडोह धरणाचे पाणी सोडल्यास जवळपास अकरा गावातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटू शकतो. याआधी मंजूरीपण मिळालेली होती. पण माशी कुठे शिंकली कळले नाही. या तलावाचे कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात आल्यास झरी, मुर्झा, पारडी, मालदा, चिचाळ, दहेगाव यासारख्या असंख्य गावांना शेतीला सिंचनाची पुरेपुर सोय उपलब्ध होऊ शकते.
याशिवाय परिसरात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आवासून उभा ठाकला आहे. झरी, मुर्झा व पारडी हे गावे जंगलव्याप्त असून मोठ्या प्रमाणात वनसंपदा उपलब्ध आहे. त्यावर आधारित उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी दहेगाव माइंस बरेच वर्षे कार्यरत होती. ती आता बंद असून माईन्स पूर्ववत सुरु करून बेरोजगारांना त्याठिकाणी रोजगार मिळेल या प्रमुख तीन कारणांसाठी सामाजिक कार्यकतर्ये मानबिंदू दहिवले यांच्या नेतृत्वात दिघोरीचे सरपंच अरुण गभणे, दिघोरीचे उपसरपंच रोहिदास देशमुख, राजूरी थुलकर, तावशीचे सरपंच रामदास बडोले, खोलमाराचे सरपंच अम्रृत मदनकर, मुर्झाचे सरपंच भोजराम ठलाल, चिचाळचे सरपंच लक्ष्मण जांगळे, चिकनाचे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, दहेगावचे सरपंच राकेश झाडे, पारडीचे सरपंच मिना ब्राम्हणकर, मुरमाडीचे सरपंच सुवर्णलता सोनटक्के, साखराचे सरपंच गीता बांगरे आणि शेतकरी संतोष गोंधोळे, ईश्वर मेश्राम, अभिमन पारधी, गजानन कावळे, नेपाल ठवकर, धर्मपाल किरझान, बाजीराव टेंभुर्णे, नीळकंठ डडमल, रामदास बन्सोड, लालदास कांबळे, दुधराम ठलाल, कैलाश सूर्यवंशी, नारायण मेश्राम, किशोर चव्हारे, देवराम कांबळे आणि उर्मिला ब्राम्हणकर उपोषणाला बसले आहेत. सदर उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.