सौंदड,गोरेगाव सालेकसा ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधिकार्याविना

0
58

गोंदिया दि.२३ :: जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी व सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची वाणवा असल्याने रुग्णांना जीव मूठीत घेऊन खासगी डाॅक्टरांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे.तर ज्या सोयी सुविधा पोचवायला हव्या होत्या,त्या शासनाने अद्यापही न दिल्याने हे रुग्णालयच नरकयातना भोगत असल्याचे चित्र सौंदड,गोरेगाव व सालेकसा येथील रुग्णालयाकडे बघितल्यास दिसून येते.

सडक अर्जुनी तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सौंदड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५ वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. मोठ्या थाटात ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन त्यावेळचे आमदार व आताचे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून या ग्रामीण रुग्णालयाला अवकळा आली, ती आजही कायम आहे.ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन आज ५ वर्षाचा कार्यकाळ लोटला, तरी रुग्णालयातील आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा, डॉक्टर, परिचारिकांचा व कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. आवश्यक यंत्रसामुग्रीची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात हे रुग्णालय सापडले आहे. येथे ३ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती आहे. मात्र, कंत्राटी डॉक्टरच्या भरवशावर हे ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. हे कंत्राटी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात २ ते ३ तास सेवा देतात. या डॉक्टरांना शाळा, अंगणवाडी तपासणीची कामे असल्याने या ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ सेवा देऊ शकत नाही. येथे कोणतेही रोगनिदान करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे तर आरोग्य सेवेसाठी रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.

 सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयाचा भार केवळ एका कंत्राटी डॉक्टरवर असल्याने रुग्णांना चौवीस तास आरोग्य सेवा कशी मिळणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.रुग्णालय सुरू होवून २५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र सोयीसुविधा पुरविण्याकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याचा आर्थिक भुर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील आदिवासी जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी या उद्देशाने ९० च्या दशकात सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत १९९४ मध्ये येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले. तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.काही काळ ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवा सुरळीतपणे सुरू होती.येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची चारे पद मंजूर आहेत. त्यात एक अधीक्षक, दोन शल्यचिकित्सक व एक स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश आहे.डॉक्टरांची चार पदे मंजूर असली तरी आजवर येथे केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे. मागील दोन वर्षापासून अधीक्षक डॉक्टर म्हणून डॉ. पी. एस. रामटेके कार्यरत आहे.तर चार महिन्यांपूर्वी डॉ.अभिषेक चांद रुजू झाल्याने रुग्णसेवा सुरळीत झाली होती. डॉ. रामटेके हे त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे सध्या रुग्णालयाचा भार डॉ. चंद यांच्यावर आहे.मात्र आरोग्य विभागाने अद्यापही रुग्णालयात पर्यायी डॉक्टराची नियुक्ती केली नाही.
तर जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असलेल्या गोरेगाव या तालुक्या मुख्यालयी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातही वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होऊ लागली आहे.