महाराष्ट्र अंनिसच्या कविसंमेलनात ‘गुंज उठा संविधान’

0
11

गोंदिया,दि.29 : गेल्या ११ वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित करीत असलेल्या संविधान जागर उपक्रमांतर्गत समितीच्या गोंदिया जिल्हा शाखेतर्फे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या सभागृहात आयोजित कविसंमेलनात ‘भारताचे एकच विधान, संविधान, संविधान!, देश मे एकही नाम, संविधान, संविधान!’ असा रोमहर्षक स्वर गुंजला आणि उपस्थित श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

प्रारंभी संविधानदिन व संविधान जागर कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा न.प. गोंदियाच्या सदस्य निर्मला मिश्रा आणि अतिथी डॉ. सुगत चंद्रिकापुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कृष्णा मेश्राम, गुरमीतसिंह चावडा, माजी न.प.सदस्य गोंडाणे आणि महेंद्र कठाणे यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अंनिस गोंदिया जिल्हा शाखा उपाध्यक्ष डॉ. माधवराव कोटांगले यांच्या संचालनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच येत्या ८ व ९ डिसेंबरला मुंडीकोटा येथे होऊ घातलेल्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद रंगारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन समितीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष माणिक गेडाम, कार्याध्यक्ष अनिल गोंडाणे, उपाध्यक्ष डी. टी. कावळे, व डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माणिक गेडाम यांनी महाराष्ट्र अंनिसची भूमिका विशद करताना संविधानाच्या चौकटीत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य मागील ३० वर्षापासून करीत असल्याचे स्पष्ट केले आणि या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.उद्घाटन कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कवी रमेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व कवी युवराज गंगाराम यांच्या सूत्रसंचालनात कविसंमेलन तब्बल साडेतीन तास रंगले. आमगाव येथील प्रा. मिलिंद रंगारी, असीम आमगावी, प्रियंका रामटेके, लांजी (म.प्र.) येथील डॉ. किशोर सोनवाणे, गोंदियाचे शशी तिवारी, मनोज बोरकर, निखिलेशसिंह यादव, छगन पंचे, सुरेंद्र जगणे, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. नूरजहाँ पठाण, शिव नागपुरे, महेंद्र कठाणे, प्रदीप ढोके यांच्या कवितांनी संविधान जागराचा संदेश हास्य-विनोद व गंभीर शैलीतून दिला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉलेजचे प्राचार्य विक्रांत चौधरी, प्रा. शारदा चौधरी, प्रा. ललित डबले, प्रा. प्रदीप ढोके, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. अनसूया लिल्हारे, समितीचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गोंडाणे, प्रधान सचिव विनोद बन्सोड, ॲड. अमित उके, पल्लवी रामटेके यांनी सहकार्य केले. उपाध्यक्ष डी. टी. कावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले..