जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते महारेशीम नोंदणी अभियानाचा शुभारंभ

0
9

वाशिम, दि. १७ :  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने जिल्ह्यात ‘महारेशीम नोंदणी अभियान २०१९’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून झाला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महारेशीम नोंदणी अभियानांतर्गत ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जावून चित्ररथाद्वारे रेशीम शेतीविषयी जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथासोबत जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. गावोगावी जावून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्याची इच्छा आहे, त्यांनी अभियान कालावधीत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी पुसद नाक्याजवळील उलेमाले यांच्या बंगल्यातील जिल्हा रेशीम कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा  ०७२५२-२३२५५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मोरे यांनी यावेळी केले.