जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री

0
28

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेली 313 गावे पाणी टंचाईमुक्त व्हावी यासाठी नियोजनबद्ध काम करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेताना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीस विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.अर्चना कडू, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे तसेच उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 40 टक्के भाग बेसाल्ट खडकाचा आहे. यात काटोल, नरखेड, हिंगणा व नागपूर तालुक्याचा समावेश होतो. येथे भूजल पुनर्भरण प्रमाण अल्प आहे. काटोल व नरखेड तालुक्यात 135 गावे अशंत: शोषित आहेत. मागील 5 वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर 2014 मध्ये पाण्याच्या पातळीत जिल्ह्यातील 7 तालुक्यात सरासरी 0 ते 1 मीटर घट तर इतर 6 तालुक्यात 0 ते 1 मीटर वाढ झाली आहे. महसूल, जलसंधारण, वन, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद या विविध विभागातील वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक गाव दत्तक देण्यात आले आहे, अशी माहिती सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी बैठकीत दिली.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ई-म्युटेशन ही योजना नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 496 तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनर देण्यात आले आहे. ऑनलाईन म्युटेशन सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक तालुका व उपअधीक्षक कार्यालयात म्युटेशन सेल्स स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महसूल, भूमीअभिलेख, नोंदणी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना औरंगाबाद व तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख अधीक्षक श्री.मोरे व इतर अधिकारी उपस्थित होते.