जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी लोकसहभाग वाढवा-शैलेश हिंगे

0
23
  • ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा
  • बीजेएसच्या १३ पोकलॅन मशीन जिल्ह्यात दाखल

वाशिम, दि. २९ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएस यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे सुरु आहेत. जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी या अभियानात लोकसहभाग वाढवून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक असून याकरिता लोकप्रतिनिधी व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. नियोजन भवन सभागृहात आयोजित ग्रामस्तरीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. सोळंकी, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांची उपस्थिती होती.

श्री. हिंगे म्हणाले, ‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियानामुळे जिल्ह्यात कमी खर्चात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. या कामांमध्ये लोकसहभाग महत्वाचा घटक असून कामांसाठी ठराव सादर करण्याची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्थांनी आपल्या गावातील ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहाय्यक यांच्याकडून माहिती घेऊन कामांचे ठराव सादर करावेत. जिल्ह्यात सध्या अनेक गावांमध्ये या अभियानातून चांगले काम होत आहे. या गावांचा आदर्श इतर गावांनी घेवून आपल्या गावातही जलसंधारणाची अधिकाधिक कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. बागरेचा यांनी यावेळी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच इतर ज्या गावांनी अद्याप या अभियानात सहभाग घेतलेला नाही, अशा गावांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.श्री. सोमाणी यांनी बीजेएसच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाविषयी माहिती देवून सर्वांनी या अभियानात झोकून देवून काम करण्याचे आवाहन केले.

‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियान अंतर्गत कृषि विभागामार्फत कोणकोणती कामे करता येतील याबाबत श्री. गावसाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच ही कामे प्रस्तावित करण्याची कार्यपद्धती सांगितली. वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी अभियान राबविताना येत असलेले अनुभव व समस्या याविषयी माहिती दिली. तसेच चिखलीचे कृषि सहाय्यक श्री. दंडे यांनी अभियान राबविताना आलेले अनुभव विषद केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व कृषि सहाय्यक उपस्थित होते. बीजेएसचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार, अभिलाष नरोडे, श्याम भूसेवर, वैभव कीर्तनकार, प्रफुल्ल बानगावकर, वसंत इंगळे, संदीप कांबळे, प्रवीण भांडे, श्री. मीने यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.

जिल्ह्यात आलेल्या १३ पोकलॅन मशीनचे पूजन

‘सुजलाम सुफलाम वाशिम’ अभियानासाठी भारतीय जैन संघटनेने यापूर्वी २८ जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले आहेत. मात्र काही ठिकाणी पोकलॅन मशीनची मागणी होत होती. त्यानुसार आज बीजेएसच्या माध्यमातून १३ पोकलॅन मशीन जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या उपस्थितीत या मशीनचे पूजन करून जलसंधारणाच्या कामासाठी या मशीन रवाना करण्यात आल्या.