उज्‍जवला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्यावा- पालकमंत्री बडोले

0
17

गोंदिया,दि.30ः- प्रधानमंत्री उज्‍जवला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पा असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बीपीएल धारकांना उज्‍जवला गॅस योजनेचा लाभ दयावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बीपीएल धारकांना प्रधानमंत्री उज्‍जवला गॅस योजनेच्या लाभाबाबत आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक मुंढे व जिल्हा पुरवठा अधिकारी ए. के. सवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. बडोले पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री उज्‍जवला गॅस योजनेअंतर्गत बीपीएलधारक लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी व तलाठी यांच्या समन्वयाने प्रत्येक तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करावी. यासाठी गॅस एजन्सीधारकांनी सहकार्य करावे. येत्या ३0 दिवसात जिल्ह्यातील सर्व गरजू लाभार्थ्यांना उज्‍जवला गॅस योजनेचा लाभ देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांना गॅस रिफीलींग वेळेवर झाली पाहिजे जेणेकरुन सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी गॅस वितरक एजन्सींना दिल्या. यावेळी त्यांनी गॅस वितरक एजन्सीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेला गॅस कंपन्यांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक एजन्सीधारक उपस्थित होते. यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्याबाबत आढावा घेण्यात आला.