ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना

0
20

गोंदिया,दि.२३ : जिल्ह्यात अवैध रेती उपसा वाहतूक अद्यापही सुरूच आहे. यापुर्वी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणार्‍यांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येत होते. परंतु, मागील काही महिन्यांपासून हा प्रकार वाढल्याने प्रशासनाने कठोर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने तालुक्यातील धापेवाडा येथील घाटावरुन अवैधरित्या टॅ्रक्टर ट्रॉलीमध्ये रेती वाहतूक करून आढळलेल्या ट्रॅक्टर मालक पुरूषोत्तम धनलाल बैठवार रा.महालगाव याच्यावर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राहुल सारंग यांनी एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपयाचा दंड ठोठावून तो दंड शासन जमा करण्याचे आदेश बजावले आहे.
जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानंतर अद्यापही रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. जिल्ह्यातील रेती तस्कर या संधीचा लाभ घेत रात्रीच्या वेळेस या रेती घाटावरून अवैधरित्या जेसीबीच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन करून ती रेती विक्री करीत असतात. हा प्रकार तिरोडा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रेती घाटांवर हमखास सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचे महसूलही बुडत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाला माहित राहूनही त्यावर अंकुश लावण्यास मात्र शासन अपयशी ठरला आहे. मागील काही दिवसांपासून तहसीलदार राहुल सारंग यांनी कारवाईचे सत्र सुरू केले असून यापुर्वी दांडेगाव येथील एका प्रकरणात अडीच लाखाचे दंड ठोठावल्याचे प्रकरण ताजे असताना २१ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मालकावर दंड आकारून प्रशासन हे प्रकार थांबविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून दिले आहे. १९ जानेवारी रोजी महालगाव येथील पुरूषोत्तम बैठवार यांच्या ट्रॅक्टर क्र.एमएच-३५/जी-६५९५ व ट्रॉली क्र.एमएच-३५/६७६१ हे विना परवाना रेती वाहतूक करताना आढळून आले. वाहन चालक सुरेंद्र नैकाने यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती पकडण्यात आली. पंचनामा करून मालकावर एकूण १ लाख १५ हजार ४०० रूपयाचा दंड आकारण्यात आला. हे दंड शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहुल सारंग यांनी दिले आहे. तहसीलदार सारंग यांच्या कारवाईने तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिज वाहतूक व व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत