बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ ग्रामसेवक, प्राधिकृत अधिकारी यांची स्वाक्षरी आवश्यक

0
11

वाशिम, दि. २५ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडीत काम करीत असलेल्या कामगारांची रीतसर नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रदान करण्यात येत आहे.

मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी मागील एक वर्षात किमान ९० दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून ग्रामसेवक तसेच नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अथवा अन्य प्राधिकृत अधिकाऱ्यानेनिर्गमित केलेल्या प्रमाणपत्राद्वारे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक दस्तावेजसह सादर करणे आवश्यक आहे. याकरिता नोंदणी फी २५ रुपये व दरमहा ५ रुपये प्रमाणे एकूण ६० रुपये भरून एक वर्षापर्यंत नोंदणी करता येईल. तसेच दरवर्षी नुतनीकरण करणे अनिवार्य आहे.

शासनाने बांधकाम केल्याच्या प्रमाणपत्रामध्ये सुधारणा करून त्या प्रमाणपत्रावर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्गणीची रक्कम दरमहा ५ रुपये ऐवजी १ रुपये करून पुढील पाच वर्षांकरिता प्रतिमाह १ रुपये प्रमाणे एकूण ६० रुपये भरून ५ वर्षांकरिता नोंदणी करता येते. तथापि, मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर बांधकाम मजूर पात्र ठरण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगाराने दरवर्षी मागील वर्षात कमीत कमी ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र मंडळास रीतसर सादर करणे किंवा नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्राच्या भाग-३ मध्ये मालकाची स्वाक्षरी आवश्यक असून संबंधित विभाग प्राधिकृत अधिकारी यांनी खातरजमा करणे आवश्यक आहे. जेणेकरून पात्र बांधकाम कामगारांना मंडळातील विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रदान करणे सोयीचे होईल, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.