डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

0
11

वाशिम, दि. २५ : समाज कल्याण क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्ती, संस्थांकडून सन २०१८-१९ या वर्षासाठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात येत असून हे प्रस्ताव ३० जानेवारी २०१९ पर्यंत सादर करावेत, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

समाज कल्याण क्षेत्रात म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती यांचे कल्याण कार्य तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या मनोदुर्बल, अपंग, कुष्ठरोगी इत्यादी दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी सतत झटणाऱ्या किमान ५० वर्षे पूर्ण केलेल्या पुरुष अथवा ४० वर्षे पूर्ण केलेली स्त्रियांना या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवता येतील. पुरस्कारासाठी धर्म, लिंग, जात याचा विचार केला जाणार नाही. व्यक्ती अथवा संस्था किमान १५ वर्षांपासून समाजिक क्षेत्रात काम करत असेल तर ती प्रस्ताव पाठवण्यास पात्र असेल. सन्मानीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा पदाधिकारी यांना प्रस्ताव पाठविता येणार नाही. प्रस्ताव पाठवताना आपले संपूर्ण वैयक्तिक जीवन चारित्र्य व कार्याचा आलेख पुराव्यासह जोडावा. संबंधितांनी संपादन केलेले विशेष यश किंवा उत्कृष्ट कार्य याची सविस्तर माहिती अर्जासोबत प्रस्तावात नमूद करावी. हा प्रस्ताव तीन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

संस्थेसाठी तिचे नोंदणी प्रमाणपत्र, आर्थिक व्यवहारात कोणतेही गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र, संस्थेचे कार्य पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असल्याचे प्रमाणपत्र, संस्थेच्या कार्यासंबंधी माहिती व समाज कल्याण क्षेत्रात केलेले भरीव कार्य व आजपर्यंत संस्थेने त्यांचे उद्दिष्ट कितपत साध्य केले याचा अहवाल, संस्थेच्या घटनेची प्रत व संस्थेच्या मागील ५ वर्षाचे वार्षिक अहवाल या बाबींसह प्रस्ताव सादर करावेत. चारित्र्य प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास प्रस्तावासोबत द्यावे. पुरस्कारासाठी पाठवण्याच्या अर्जाचे नमुने व इतर माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली सुर्वे रोड, वाशिम येथे सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. ३० जानेवारी २०१९ नंतर आलेल्या अर्जांचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.