आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू – पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव

0
24

गडचिरोली,दि.26 : लोककल्याणकारी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सबका साथ सबका विकास या न्यायाने पुढे जाऊ या. शासन कायम शेतकरी, युवक आणि प्रत्येक आम आदमीच्या पाठिशी आहे. येणाऱ्या काळात विकासाची गती वाढवू आणि आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यानी केले.
येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानांवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा झाला. पालकमंत्री राजे अंब्रीशराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलीस दल तसेच गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्वीकारली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगत गेला. या मुख्य शासकीय सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं असे ज्ञात, अज्ञात देशभक्तआणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी देशाच्या सिमेवर प्राणांचे बलिदान देणारे सैनिक व जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले जवान यांना मन:पुर्वक श्रध्दांकजली अर्पण करुन त्यांनी जिल्हा वासियांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री म्हणाले की, आम आदमीच्या विकासाच्या उद्दीष्टाने गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मिळविण्यासोबतच विविध योजना राबविण्यात शासनाला यश आले आहे. यापुढील काळातही याची गती कायम राहील याकरिता शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. आपला जिल्हा हा शेतीचा जिल्हा आहे. येथे सिंचन प्रकल्प कमी आहेत. यासाठी जलयुक्त शिवार तसेच मागेल त्याला शेततळे आणि धडक सिंचन विहीरी याला प्राधान्य दिले. यामुळे एक हंगामी शेतीचा हा गडचिरोली जिल्हा आता दोन हंगामी शेतीकडे वळला आहे. यावरुनच 4 वर्षात झालेल्या विकासकामांचे यश आपणास दिसत आहे.
शेतकरी बांधवांच्या शेतीला संरक्षित सिंचन उपलबध झाल्याने जिल्ह्यात धानासोबतच कापसाचे उत्पादनही घेतले जात आहे. असे सांगून ते म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकसान झाल्याच्या स्थितीत त्यांना आधार मिळावा यासाठी ` छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ` आणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. या पीक कर्ज माफीचा लाभ गडचिरोली जिल्ह्यात अडतीस हजार दोनशे नौव्यान्नव (38 हजार 299) शेतकऱ्यांना झाला. या योजनेअंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनापोटी या सर्वांना एकशे चौदा कोटी अकरा लाख रुपयाचा लाभ देण्यात आला (114 कोटी 11 लाख ). सोबतच खरिपासाठी नव्याने सुमारे एकशे पाच कोटी (105 कोटी) रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे असेही ते म्हणाले. तसेच अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार व्हावा म्हणून शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. या अंतर्गत पंच्याहत्तर (75) शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख ( 2 लाख )रुपये मदत देण्यात आली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.
आदिवासी विकास महामंडळाच्या व पुरवठा विभागाच्या माध्यमातून शासन येथे धान खरेदी करीत आहे. जिल्ह्यात सहा लाख अठ्यांशी हजार (6 लाख 88 हजार) क्किंटल धान आतापर्यंत खरेदी करण्यात आलेले आहे. साधारण ( 110) एकशे दहा कोटींची खरेदी या माध्यमातून झाली आहे. धानाचा हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांना उत्पन्न सुरु रहावे यासाठी मनरेगाच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करीत आहे. यातून आतापर्यंत साधारण त्र्याऐंशी कोटी (83 कोटी) रुपयांच्या खर्चाची कामे झाली आहेत असे सांगितले.
आपला हा जिल्हा आदिवासी बहुल आणि दुर्गम असा जिल्हा आहे. येथे आव्हानात्मक असणारे गाव तिथे वीज नेण्याचे काम शासनाने पुर्ण केले असून घरोघरी वीज पुरवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ` सौभाग्य ` योजनेअंतर्गत काम सध्या सुरु आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हयाला चालू वर्षात (234) दोनशे चौतीस कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षात या आदिवासी विकासाकरिता दिलेला एकूण निधी (1100) अकराशे कोटींहून अधिक आहे असे म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. विविध निर्देशांकावर आधारित कालबध्द कार्यक्रमात जिल्यात त विविध विभाग विकासाचे काम करीत आहे. यासाठी देखील त्रेचाळीस कोटींचा (43) कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासोबतच कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीतून येथील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे तसेच स्वयंरोजगारासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करुन देण्याचे कामही शासन करीत आहे. या सोबतच पर्यटन विकासाच्या योजनांमधून कायमस्वरुपी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास शासन कटिबध्द आहे.
जिल्ह्यात दळण वळण व्यवस्था उत्तम असावी यासाठी जिल्हा मार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून विस्तारीत करण्याचे काम देखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे इंद्रावती नदीवर पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर आंतरराज्य संपर्क सोपा होणार आहे असे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात शिक्षण सुविधा वाढाव्यात यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठासाठी स्वतंत्र जागा असावी यासाठी शासनाने एकोन्नवद कोटींचा (89 कोटींचा) विशेष निधी दिला आहे असेही ते म्हणाले.
आपल्या जिल्ह्यात पोलीस दलाची भूमिका महत्वाची आहे. या वर्षभराच्या काळात पोलीस दलाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. जिल्ह्यात वर्षभरात 50 मावोवाद्यांचा खात्मा पोलीस दलाने केला. तसेच आत्मसमर्पण योजनेतून 18 जणांनी शरणागती पत्करली. पोलीस दलाच्या या कामगिरीबध्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील युवकांना पोलीस भरतीत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी खास बाब म्हणून जिल्ह्यातील युवकांनाच पात्र समजावे असे विशेष आदेश शासनाने जारी केला आहे, हे याप्रसंगी आवर्जून सांगितले. जिल्हयात वनांवर आधारित उद्योग व्हावेत व स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठीही शासन काम करित आहे असे ते म्हणाले.
ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनांच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई व शबरी आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पक्की घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. या घरांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा एक महत्वाचा निर्णय शासनाने नुकताच घेतला. यामुळे या कामाला अधिक गती येईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
आम आदमी केंद्र स्थानी मानून शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकूल योजना यासोबतच MSRLM (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान ) पंतप्रधान जीवनज्योती योजना, अटल पेन्शन योजना तसेच मुद्रा लोन योजना आदी अनेक योजनांच्या माध्यमातून `आम आदमी` चा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन कटिबध्द असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस दलातील केंद्र शासनाकडून पराक्रम पदक पुरस्कारांनी राजु हनुमंत सिडाम, महेश गणुजी कुलेटी, गणेश मोहुर्ले, विजय चिंतामन टाल्टे, किरण बुचय्या दुर्गम, रमेश बोडका गावडे यांचा समावेश आहे. महसुल विभागातील मावा गडचिरोली स्पर्धेतील आंकाक्षित जिल्हा कक्षांतर्गत सिमा आटमांडे (कुरमाघर), कु. प्राची मोहरकर (सुतक प्रथा), वर्षा वशिष्ट (सकस आहार), पुंडलीक काटकर (कृषि पुरक व्यवसाय), चंद्रशेखर गुरनूले (परसबाग), विजय दिगडे (गडचिरोली ब्रांड), मनिषा पोड (वनोपज) , अनिकेत सोनोने (स्वंयरोजगार) , सदानंद धुडसे (प्राथमिक शिक्षण), सारंग तरारे (शाळा व्यवस्थापन), राजू सोरते (आर्थिक समावेशन) यांचा यावेळी 10 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद विभागाकडून वनराई बंधारे बांधकाम उपक्रमांतर्गत ग्रांमपंचायतींचा सत्कार करण्यात आला. ग्रामंचायत तोडसा, जांभुळखेडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. जिल्ह्यातील सिकई खेळात अनेक विक्रम करणारी एन्जल देवकुळे हिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून तिचा सत्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते झाला आहे. सेजल गद्देवार, रजत सेलोकर , ईशा कोवासे, अंकित कन्नया, विकी पोदादी, सार्थक पुध्दटवार, यांचा गौरव करण्यात आला. सोबतच आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली तर्फे जिल्ह्यातील स्थानिक भाषामध्ये आपत्ती व्यवस्थापना संबंधी जनजागृती विषयीची चित्रफीतचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदिप शिंदे यांच्या मार्गदर्शनात क्रिडा अधिकारी मदन टापरे आणि ओमप्रकाश संग्रामे सैनिकी विद्यालय यांनी केले. तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी मानले.