चंद्रपूरातील दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला नागपूरातून सहलीला सुरूवात

0
18

नागपूर, ता. ५ – आदिवासी विकास विभाग व महाराष्ट्र पोलीसांमर्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतगर्त पोलीस अधिक्षक चंद्रपूरतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची पहिली सहल महाराष्ट्र दर्शनाला निघाली आहे. या सहलीची सुरूवात नागपूरात झाली.
नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना राज्यातील औद्योगीक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषीविषयक प्रगती यांचे दर्शन घडवून आणणे व त्यांच्या सार्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास साधणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ही सहल आयोजित करण्यात येते. या अंतर्गत आत्तापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या २२ सहली आयोजित करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच सहल आहे. नक्षल विरोधी अभियानाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे व चंद्रपूर पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ही सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीत विविध आश्रम शाळांमधील ४५ मुली व १५ मुले अशा एकूण ६० मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या सहलीत चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी, महिला पोलीस उपनिरीक्षक ढाले यांच्यासह पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई व आरोग्य पथकातील कर्मचा-यांचा समावेश आहे.
या सहलीला चंद्रपूरातून हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर नागपूरात आगमन झाले. नागपूरात या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर, दीक्षाभूमी, सुराबर्डी येथील आश्रम यासह विविध ठिकाणी भेटी दिल्या. पुढे ही सहल नाशिक, मुंबई आदी शहरांना भेटी देऊन त्या ठिकाणची माहिती जाणून घेणार आहे.
यावेळी सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापुर्वी आम्ही कधीही चंद्रपूर जिल्ह्याबाहेर गेलो नाही. आश्रम शाळेतच शिक्षण व राहण्याची सोय असल्यामुळे इतर शहरांशी आमचा कधीही संबंध आला नाही. मात्र महाराष्ट्र दर्शन सहलीच्या निमित्ताने प्रथमच नागपूर शहर पहायला मिळाले. विमान पाहण्याचा आनंदच वेगळा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.