मागील दहा वर्षांत खऱ्या अर्थाने रापेवाडाचा विकास

0
17

गोंदिया,दि.07ः : तालुक्यातील रापेवाडा गावाचा २००९ पूर्वीपर्यंत गोरेगाव विधानसभा क्षेत्रात समावेश होता. त्यामुळे या गावाचा विकास खुंटला होता. मात्र, २००९ मध्ये या गावाचा गोंदिया विधानसभा क्षेत्रात समावेश झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाला सुरुवात झाली. मागील दहा वर्षांत या गावातील नागरिकांनी परिसराचा विकास होत असल्याचे पाहिले, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.स्थानिक विकास आमदार निधीतून मंजूर रापेवाडा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (ता.३०) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी सभापती स्नेहा गौतम, गुनीलाल शरणागत, समीर टेंभुर्णीकर, मंजू गाते, प्रमिला कटंगवार, पुष्पा खोब्रागडे, अंतकला ठलाल, भुमेश्वरी राऊत, अनिता बडगे, डॉ. दुलीचंद इंगोले, ओमकार दहीकर, शीला मडकाम, हेमराज गाते, हेतराम रहांगडाले, अविनाश गोंडाणे, मनोहर गाते, राजेश तालटे, कान्हुलाल गौतम, सेवकराम गौतम उपस्थित होते. .

अग्रवाल पुढे म्हणाले, रापेवाडा येथील पाणीपुरवठा योजना, स्मशान घाट आदी ५६ लाख रुपयांच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच रापेवाडा-गोंदेखाली व रापेवाडा-डव्वा या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. गोंदिया विधानसभा क्षेत्रात आपल्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाजपा नेत्यांच्या पोटात आता दुखू लागले आहे. मागील साडेचार वर्षांत विद्यमान भाजपा सरकारला ठोस असे काहीच करता आले नाही. त्यामुळे आता खोट्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आपण या परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.जयचंद पारधी म्हणाले, भाजपा नेते म्हणजे बडे बोल आणि काम गोल असेच असल्याचा आरोप केला. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपा सरकारने शेतकी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला मोठी आश्वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले. .