कल्पनांचे सीमोल्लंघन करुन विकास गाठू- केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू

0
13

गोंदिया,दि.09 : कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कल्पना आणि लोकसहभाग महत्वपूर्ण असतो. जसा सक्रीय लोकसहभागातून विकास पूर्णत्वास जातो तसेच समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी नवकल्पना महत्वपूर्ण ठरतात. अशाप्रकारे जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू मानून नवकल्पनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विकास गाठू असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथे केले.
‘हिरकणी महाराष्ट्राचीङ्क आणि ‘जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धाङ्क या दोन महत्वाकांक्षी योजनांचे आज मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुम येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर,कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र सिंह यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा स्तरावर नवकल्पनांना एक व्यासपीठ प्रदान करण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र राज्य आणि स्टार्टअप इकोसिस्टम यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी, जिल्हा व्यवसाय योजना स्पर्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजनातून समस्येवर एक अंमलबजावणीपर उपाय सुचविणे, जिल्ह्याच्या प्रगतीत वाढ होण्यासाठी तसेच जिल्हा सुधारण्यासाठी एक नाविन्यपूर्ण उत्पादन / प्रक्रिया तयार करणे आवश्यक असेल. आरोग्य सुविधा, शेती, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव, संतुलित विकास आणि पर्यावरण अशी क्षेत्रे या स्पर्धेसाठी निवडण्यात आली आहे. अद्वितीय प्रस्तावना, संघ नेतृत्व, सामाजिक प्रभाव, तांत्रिक फायदे, टिकाऊपणा आणि कौशल्य क्षमतांवर यासारख्या निकषांवर विजेते निवडण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या उद्योजक महिलांना उपलब्धतेनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांना भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांच्या नवनवीन कल्पना वर्ल्ड इकॉनॉमीक फोरम यांसारख्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेऊन युएन, वर्ल्ड बँक च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही श्री. प्रभू यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांच्याशी संवाद साधला. यावेळी नगरविकास राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संवादात सहभाग घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी.मुंडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राजू माटे, जिल्हा उद्योग केंद्राचे हेमंत बदर, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, माविमचे सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड व जिल्हा अभियान व्यवस्थापक देविदास नारनवरे उपस्थित होते.